पुणे : बर्याच प्रतीक्षेनंतर भारतात मान्सूनचे आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केली. दक्षिण भारतातील या राज्यात बर्याच काळापासून पाऊस सुरू होता, पण आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राज्यात १ जूनला मान्सूनचे आगमन होणार होते.
हवामान विभागाने सुरुवातीला असा अंदाज वर्तवला होता की, केरळमध्ये मान्सून २६ मे पर्यंत दाखल होऊ शकतो. तेव्हा चार दिवसांचा विलंब किंवा लवकर आगमन होण्याचाही अंदाज वर्तवला होता. पावसाळा ३० मे पर्यंत सुरू होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. तरीही मान्सूनला विलंब झाला. इतकेच नव्हे तर मान्सून नेहमीच्या १ जूनच्या तारखेला दाखल झाला नाही, त्यामुळे पावसाला चार दिवसांचा उशीर झाला.
गुरुवारी सकाळी केरळच्या अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात अलप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पत्तनमथिट्टा, इडुक्की आणि त्रिशूर जिल्ह्यात पावसाच्या सौम्य ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा
केरळसह तामिळनाडू आणि कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यात पुढील ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. केरळच्या अनेक भागात आधीच जोरदार पाऊस सुरू आहे. ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तेलंगणासह २४ राज्यांमध्ये पाऊस आणि वेगवान वारे वाहतील असं हवामान खात्याने सतर्क केले आहे. हवामानातील बदलामुळे आजही गुजरात, पश्चिम राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान ४० डिग्री सेल्सिअसपुढे आहे. महाराष्ट्रात पुढील २ दिवसांत मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. ६ ते ७ तारखेला मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागात पावसाला सुरुवात होईल.
दरम्यान, भीषण उष्णतेने हैराण झालेल्या भारतातील उत्तर पश्चिम राज्यांमध्ये मान्सूनच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. ३० जूनपर्यंत मान्सून संपूर्ण देशाला व्यापेल असं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. राजधानी दिल्लीपर्यंत मान्सून पोहचण्यासाठी २५ ते ३० जून कालावधी लागू शकतो.